तिकोना ( Tikona Fort )हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण ६० कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० फूट उंच आहे. तुंग किल्ला ३-४ कि.मी अंतरावर दिसतो. किल्ल्याच्या त्रिकोनी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले आहे .
इतिहास :
इ.स. १५८५ च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशहा याने हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला. या गडाबद्दलचा इतिहास फारसा कुठेही उपलब्ध नाही. शिवरायांनी १६५७ मध्ये जुन्या निजामाकडुन कोकणातील माहुली, लोहगड, विसापूर, सोनगड, तळा व कर्नाळा या किल्ल्यांसोबत हा किल्ला देखील आपल्या स्वराज्यात सामील करुन घेतला व सर्व निजामशाही कोकण शिवरायांच्या हाताखाली आले. या किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवनमावळावर देखरेखा ठेवण्यासाठी होत असे. सन १६६० या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. इ.स. १६८२ च्या ऑगस्ट महिन्यात संभाजी व अकबर याची भेट झाली. या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहण्यास आला. मात्र येथील हवा न मानवल्याने त्याला जैतापूर येथे धाडण्यात आले. इ.स. १८१८ मध्ये किल्ल्यावर छोट्या-फार प्रमाणात लढाई झाली यात किल्ल्याचे बऱ्याच प्रमाणावर नुकसान झाले. आजमितिस किल्ल्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे.
कसा आहे तिकोना किल्ला ( Tikona Fort ):
एका बाजूनं पवना धरण, तर दुसऱ्या बाजूनं कणखर मावळ प्रांत किल्ल्याला वेढून टाकतात. किल्ल्यावरील मळलेली पाऊलवाट, इतिहासाची साक्ष देणारे अवशेष, बालेकिल्ल्याची खडी चढाई हे सगळं अनुभवून जेव्हा आपण बालेकिल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो, तेव्हा तिथून दिसणारं निसर्गसौंदर्य हे खरोखरंच अवर्णनीय आहे.
आटोपशीर व त्रिकोणी आकाराचा किल्ला म्हणून याचं नाव तिकोना. वितंडगड असंही याला म्हटलं जातं. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची साधारण एक हजार ९१ मीटर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच तिकोना पेठ हे गाव वसलं आहे. या गावात पोहोचण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग चार वरून डाव्या बाजूनं कामशेत- पवनानगर फाट्याला लागावं. याच फाट्यावरून आपण पवना धरणानजीक पोहोचतो. इथून तिकोना पेठ गाव साधारण ४ ते ५ किमी अंतरावर आहे. या गावातूनच गडावर जायला वाट आहे. तिकोनाची एक डोंगरधार उजवीकडे उतरत आलेली आपल्याला दिसते. या धारेवरूनच चढाईस सुरुवात करावी. पाच मिनिटांच्या चढाईनंतर आपल्याला मेटं लागतं. मेटं म्हणजे गडावर प्रवेशद्वारापूर्वी होणारी पहिली तपासणीची जागा किंवा गडावर झालेला हल्ला परतवून लावण्याचं पहिलं ठिकाणं. यानंतर गडाचा दुसरा दरवाजा लागतो. तो वेताळ दरवाजा म्हणून ओळखला जातो. दरवाज्याच्या दोन्ही बाजूला ओसऱ्यांचे म्हणजेच पहारेकऱ्यांच्या खोल्यांचे अवशेष दिसतात. समोरील मोकळ्या जागेत दिसणारे अवशेष हे वेताळेश्वर मंदिराचे असावेत. तिथून पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूला मारुतीची मोठी मूर्ती कोरली आहे. बघताक्षणीच मूर्ती आपल्याला स्तब्ध करून टाकते. याच्या जवळच श्रीरामाची गादी नावानं एक ठिकाण ओळखलं जातं. इथं गडावरील राज्यकारभार चालवण्याची सदर होती. याशिवाय सहा खणी श्रीरामाचं मंदिर होतं. इथं वेगवेगळे सण व उत्सव साजरे केले जात असत.
डाव्या बाजूलाच एक दक्षिणाभिमुखी लेणं लागतं. हे लेणं सातवाहनोत्तरकालीन असावं. या लेण्यातच श्री तळजाई देवीचं मंदिर आहे. लेण्यात पश्चिमेच्या बाजूस एक कातळकोरीव पाण्याचं टाकं आहे. समोरच्या बाजूस एक तळंही आहे. इथलं पाणी पिण्यायोग्य आहे. तिथंच १- २ गुहासुद्धा आहेत. किल्ल्यावर निवास करण्यास उपयुक्त सोयी नाहीत; पण वेळप्रसंगी ह्या गुहांमध्ये राहाता येतं.
काही अंतरावर लागणारा चुन्याचा घाणा लक्ष वेधून घेतो. इथूनच बालेकिल्ल्याची खडी चढाई सुरू होते. इथं मात्र आपला खरा कस लागतो. पायऱ्यांची उंची जास्त असल्यानं चांगलीच दमछाक होते. अशा साधारण ४० पायऱ्या चढून आपण गडाच्या माथ्यावर पोचतो. या चढाईदरम्यान गडाचा मुख्य दरवाजा लागतो. इथं उत्तम अवस्थेतील देवड्या आहेत. गडमाथ्यावर जरंडेश्वराचं छोटेखानी मंदिर आहे. इथल्या शिवलिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्ण शाळिग्रामचं आहे. हे मंदिर खोदीव पाण्याच्या टाकीवर उभं आहे. मंदिरासमोर उघड्यावरच नंदी आहे. मंदिराच्या आजूबाजूला पाण्याचा हौद, दोन तळी, धान्यकोठारं यांसारखे बरेच उध्वस्त अवशेष आढळतात. बालेकिल्ल्याच्या माथ्यावरून बरेच डोंगर नजरेस पडतात. यात लोहगड- विसापूर ही जोडगोळी, कोरीगड यांचा समावेश आहेच; शिवाय आपल्याला सर्वांत जास्त आकर्षित करतो, तो तुंगचा सुळका. पवना धरणाच्या निळ्याशार पाण्यानं वेढला गेलेला तुंग पाहून चढाईचा सगळा शीण निघून जातो.
गडावर जाण्याच्या वाटा:
तिकोना पेठेतून जाणारी वाट उभ्या कड्यावरुन थेट गडाच्या दरवाज्यात जाते. गडावर प्रवेश करण्यासाठी चार दरवाजे ओलांडावे लागतात.
मार्गपुणे - जवण नं.1 बस घेउन गडाच्या पायथ्याशी जाता येते किंवा कामशेत-कालेकॉलनीमार्गे तिकोना पेठेत पोहोचता येते.लोणावळा-दुधिवरे खिंड मार्गे काले -तिकोणा जाता येते.:तिकाेणा किल्ल्यावर ट्रेकिंग करताना ही काळजी घ्या - किल्ला चढताना ग्रिप असलेल्या शुजचा वापर करा. शक्यताे टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट परीधान करावे. - साेबत पाण्याची बाटली आणि फस्ट एड किट बाळगा. - माहिती असलेल्या तसेच किल्लावर दर्शविलेल्या वाटेवरुनच किल्ल्यावर चढाई करा. अन्यथा वाट चुकण्याची शक्यता असते. - अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांचा धाेका असताे, त्यामुळे माहीती असलेल्या वाटेनेच जा. - साेबत प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा खाण्यास काही नेले असल्यास त्याची वेष्टण बॅगेत भरुन परत घेऊन या. गडावर कुठेही कचरा करु नका.
Tikona Fort Images :
(आम्ही दिलेले माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कंमेंट मध्ये जरूर कळवा. )
(टीप : गडावर गेल्यास तिथे कुठेही कचरा करू नका. )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा