किल्ले विशाळगड हा नावा प्रमाणेच विशाल किल्ला आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या या किल्ल्याला नैसर्गिकरीत्याच दुर्गमतेच कवच लाभल आहे. हा प्राचिन किल्ला अणुस्कुरा घाट व आंबा घाट, या कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणार्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला. अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षी असलेला आणि राजधानीचा दर्जा लाभलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था उद्वीग्न करणारी आहे. मलिक रेहानच्या दर्ग्याला येणार्या हिंदू मुस्लिम भक्तांनी या परिसराचा उकीरडा केलेला आहे. आपल्या पूर्वजांनी हा गड राखण्यासाठी रक्ताचे पाणी केले, प्रसंगी बलिदानही केले याची जाणीव जेव्हा या भक्तांना होईल तोच सुदिन. इतिहास व किल्लेप्रेमींसाठी मात्र हा किल्ला संपूर्ण पाहणे म्हणजे निश्चितच एक पर्वणी आहे. इतिहास इ.स. ११९०च्या सुमारास दुसरा राजा भोज याने आपली राजधानी कोल्हापूरहून पन्हाळ्यावर हलविली. त्यानंतर त्याने घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधले. त्यापैकी एक किल्ला होता, किशागिला. (किशीगीला – भोजगड – खिलगिला – खेळणा उर्फ विशाळगड). नंतर हा किल्ला यादवांच्या हाती गेला. यादवांचा अस्त झाल्यावर दक्षिणेत बहामनींची सत्ता उदयाला आली. इ.स. १४५३ मध्ये बहामनी सेनापती मलिक उतुजार किल्ले घेण्यासाठी कोकणात उतरला. त्याने शिर्क्यांचा प्रचितगड ताब्यात घेतला व शिर्क्यांना धर्मांतराची अट घातली. पण शिर्क्यांनी मलिक उतुजारला उलट अट घातली की, प्रथम माझा शत्रु व खेळणा किल्ल्याचा शंकरराव मोरे याला प्रथम मुसलमान करा, नंतरच मी मुसलमान होऊन सुलतानाची चाकरी करीन. एवढेच सांगून शिर्के थांबले नाहीत, तर त्यांनी खेळणा किल्ल्यापर्यंतची वाट दाखवण्याचे वचन दिले. या अमिषाला भुललेल्या मलिकने शिर्क्यांच्या सल्ल्याप्रमाणे जाण्याचे ठरविल्यावर प्रारंभीच काही दक्षिणी व हबशी सैनिकांनी पहाडात/जंगलात शिरण्याचे नाकारले. उरलेल्या फौजेला घेऊन मलिक सह्याद्रीच्या अंतरंगात शिरला. वचन दिल्याप्रमाणे शिर्क्यांनी पहिले दोन दिवस रुंद व चांगल्या वाटेने सैन्याला नेले. तिसर्या दिवशी मात्र शिर्क्यांनी त्यांना घनदाट अरण्यात नेले. मैदानी मुलुखात आयुष्य गेलेल्या मुसलमान सैनिकांची सह्याद्रीच्या वाटांनी दमछाक केली. या लोळागोळा घालेल्या सैन्याला शिर्क्यांनी अशा ठिकाणी आणले की, जेथे तिनही बाजूंनी उत्तुंग डोंगर व चौथ्या बाजूस खाडी होती. तेथून पुढे जाण्यास मार्ग नव्हता व परत फिरण्यासाठी पुन्हा ती खडतर परतीची वाट कापण्याचे सैन्यात त्राण नव्हते. त्यातच मलिक उतुजार आजारी पडून त्यास रक्ताची हगवण लागली. त्यामुळे त्याला सैन्याला हुकूमही देता येईना. अशा परिस्थितीत सैन्य दमून भागून झोपले असतांना शिर्क्यांनी खेळण्याच्या मोर्यांशी संधान बांधले व मलिकच्या सैन्यावर अचानक छापा घातला. त्यावेळी झालेल्या कत्तलीत मलिक उत्तुजारसह सर्व लोक मारले गेले. या प्रसंगाचे फेरिस्ताने केलेले तपशिलवार वर्णन मुळातूनच वाचायला हवे.
१४६९ साली बहामनी सुलतानाने बब्कीरे त्याचा सेनापती मलिक रेहान याला खेळणा किल्ला घेण्यासाठी पाठविले. सहावेळा प्रयत्न करुनही त्याला हा किल्ला घेता आला नाही. सातव्या प्रयत्नात ९ महिन्याच्या निकराच्या प्रयत्नाने त्याला हा किल्ला घेता आला. या मलिक रेहानच्या नावाचा दर्गा या किल्ल्यावर आहे. त्यातील फारशी शिलालेखात वरील उल्लेख आढळतो.यानंतर जवळजवळ पावणेदोनशे वर्ष हा किल्ला बहामनी आदिलशाही या मुस्लीम सत्तांकडे होता. २८ नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव ‘विशाळगड’ ठेवले.
३ मार्च १६६० ला सिद्दी जौहारने पन्हाळ्याला वेढा घातला. त्याचवेळी जसवंतराव दळवी व शृंगारपूरचे सूर्यराव सूर्वे विशाळगडाला वेढा घालून बसले होते. पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे जाताना महाराजांनी हा वेढा फोडून काढला व महाराज विशाळगडावर सुखरुप पोहोचले. त्याआधी पावनखिंडीत ३०० निवडक मावळ्यांसह बाजीप्रभूनीं सिद्दीचे सैन्य रोखून धरले व आपल्या प्राणांची आहूती दिली. शिवरायांनी विशाळगडाच्या मजबूतीकरीता ५००० होन खर्च केल्याचा उल्लेख आहे.संभाजी महाराजांनी विशाळगडावर अनेक नविन बांधकामे केली. १६८६ मध्ये शिर्क्यांचे बंड मोडून काढण्यासाठी संभाजी महाराजांनी कविकलशांना पाठविले, परंतू पराभूत होऊन त्याने विशाळगडाचा आसरा घेतला.
इ.स. १६८९ मध्ये संभाजी महाराज विशाळगडावरुन रायगडाकडे जातांना संगमेश्वर येथे तुळापूरी पकडले गेले व त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर राजाराम महाराजांच्या काळात विशाळगड मराठ्यांच्या हालचालींचे प्रमुख केंद्र होता. रामचंद्रपंत आमात्यांनी विशाळगडास आपले मुख्य ठिकाण केल्यामुळे त्यास राजधानीचा दर्जा प्राप्त झाला. १७०१ साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई विशाळगडावर सती गेल्या.डिसेंबर १७०१ मध्ये औरंगजेब स्वत: मोठ्या फौजेनिशी विशाळगड घेण्यासाठी आला. पण विशाळगडाचे किल्लेदार परशूराम पंतप्रतिनिधी यांनी तब्बल सहा महिने किल्ला लढवून, ६ जून १७०२ रोजी अभयदान व स्वराज्य कार्यासाठी २ लाख रुपये घेऊन किल्ल्याचा ताबा औरंगजेबाला दिला. त्याने विशाळगडाचे नाव बदलून ‘सरवरलना’ असे ठेवले. विशाळगड जिंकून पन्हाळ्याला परत जातांना औरंगजेबाच्या सैन्याला सह्याद्रीने झूंजवले. तब्बल ३७ दिवसांनी पन्हाळ्याला पोहोचेपर्यंत मुघल सैन्याचे अपरिमित हाल व नुकसान झाले. त्याची वर्णने मुघल इतिहासकारांनी लिहिलेली आहेत.
इ.स. १७०७ मध्ये ताराराणीने विशाळगड पुन्हा जिंकून घेतला. पुढे विशाळगड करवीरकरांच्या ताब्यात गेला. त्यांनी तो पंतप्रतिनीधींना दिला. १८४४ साली इंग्रजांनी विशाळगड जिंकून त्यावरील बांधकामे पाडून टाकली.पहाण्याची ठिकाणेएस टी किंवा खाजगी वहानाने विशाळगडासमोरील वहानतळावर उतरल्यावर, वहानतळात व विशाळगडामध्ये एक दरी दिसते. पूर्वी या दरीत उतरुनच विशाळगडावर जावे लागत असे. परंतू आता या दरीवर लोखंडी पूल बांधलेला आहे. या पूलावरुन विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचल्यावर दोन वाटा दिसतात. समोरची खड्या चढणीची शिडीची वाट, तर उजव्या बाजूची पायर्यांची फिरुन जाणारी कमी चढणीची वाट. आपण वर जाताना शिडीच्या वाटेने जाऊन उतरताना पायर्यांच्या वाटेने उतरावे. म्हणजे किल्ल्यावरील सर्व ठिकाणे पाहून होतात.शिडीच्या वाटेने चढल्यावर दर्ग्याच्या अलीकडे डाव्या हाताला एक पायर्यांची वाट खाली उतरते. या वाटेने गेल्यावर दोन रस्ते फुटतात. उजव्या बाजूची नव्या पायर्यांची वाट भगवंतेश्वर मंदिर / राजवाडा / टकमक टोक येथे जाते. तर डाव्या हाताची जूनी फरसबंदी(दगडांची) वाट अमृतेश्वर मंदिर / बाजीप्रभुंची समाधी येथे जाते. आपण डाव्या बाजूच्या वाटेने गेल्यावर ५ मिनिटातच अमृतेश्वर मंदिरापाशी पोहोचतो. मंदिरा समोरील कड्यावरुन पडणारे पाणी कुंड बांधून आडवलेले आहे. मंदिरात पंचाननाची मुर्ती आहे. मंदिरावरुन तसेच पुढे जाऊन पाताळदरीत खाली उतरावे. या ठिकाणी एक ओढा आहे. या ओढ्याच्या पलिकडे उघड्यावर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी देशपांडे यांच्या समाध्या आहेत. या समाध्या पाहून उजव्या बाजूच्या टेकडीवर असलेले हनुमान मंदिर पाहावे. मंदिर पाहून पून्हा दर्ग्यापाशी दोन रस्ते फुटतात त्या ठिकाणी यावे.तेथून उजव्या बाजूच्या सिमेंटने बांधलेल्या पायर्यांच्या वाटेने ५ मिनिटात आपण भगवंतेश्वर मंदिरापाशी येतो. या ठिकाणी भगवंतेश्वर मंदिर, विठ्ठलाचे मंदिर व नविन बांधलेले गणपतीचे मंदिर अशी तीन मंदिरे आहेत. मंदिरासमोर चौकोनी पाण्याची विहिर आहे. श्री हर्डिकर हे मंदिराची देखभाल पाहातात. त्यांचे घर मंदिराच्या बाजूस आहे.
Photos:
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा